
लोणंद-फलटण मार्गावरील मौजे कापडगाव येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी अमीन बाबा खान शेख (वय ४७, रा. ढेबेवाडी, ता. पाटण) हे आपल्या मेहुण्यासोबत, फिरोज दुलरखान दरवेशी (रा. पाचसर्कल, साखरवाडी) यांच्यासह दुचाकीवरून शिरवळहून साखरवाडीच्या दिशेने जात होते. दरम्यान, कापडगाव शिवार येथील शिवार हॉटेल समोर अज्ञात मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात फिरोज दुलरखान दरवेशी गंभीर जखमी होऊन ठार झाले, तर फिर्यादी अमीन शेख हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९४/२०२५ बी.एन.एस. कलम २८१, १०६(१), १२५ (अ)(ब), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) (ब) प्रमाणे नोंदविण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.