शेतकऱ्यांनंतर आता शिक्षकांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू आक्रमक, अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत आंदोलन, GR रद्द करण्याची मागणी

अमरावती:शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केले. शिक्षकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी सरकारच्या आदेशाची होळी केली. जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणारा जीआर रद्द करा अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी केली.
राज्य शासनाने 15 मार्च 2024 रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करुन ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणणारा आहे. त्यामुळं सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जीआर तत्काळ रद्द करावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने काढलेला हा जीआर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 ला छेद देणारा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
शेतकरी प्रश्नावरुनही बच्चू कडू आक्रमक
विधानसभा निवडणुकीपुर्वी सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू, असे ते म्हणाले होते. आम्ही शेतकऱ्यांचे पूत्र आहोत अशी जनतेला साद घालून ते निवडून आले. परंतु, आता कर्जमाफी बाबत चकार शब्दही बोलत नाही. शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी संकटांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे. राज्यात प्रत्येक दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे अहवाल सांगतो आहे. बच्चू कडू 2 जूनला बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘अर्थसंकल्प वाचन आंदोलन’ करत त्यांना कर्जमाफीची आठवण करुन देणार आहेत. बारामतीत सुरु करणाऱ्या आंदोलनाचा शेवट नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करुन केला जाणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे. अजित पवारांच्या घरासमोरील आंदोलनानंतर बच्चू कडू पुढे टप्प्याटप्याने पंकजा मुंडे, बाळासाहेब पाटील आणि संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. यात सर्वात शेवटी कर्जमाफीच्या मुद्द्यावर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची घोषणा त्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, कर्जमाफीच्या मुद्द्यावर 7 जुलैपासून तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकूंज मोझरी किंवा आपलं जन्मगाव असलेल्या कुरळपूर्णा येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.