
गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील आरडगाव ते चव्हाणवाडी दरम्यानच्या रस्त्यावर एक दुर्दैवी अपघात घडला. अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत मच्छिंद्र उत्तम भोईटे (वय 40) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
फिर्यादी विजय बाळासो भोईटे (वय 26, रा. आरडगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चुलत्यांना रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत मच्छिंद्र भोईटे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांना व उजव्या हाताला गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अपघात घडवून आरोपी वाहनचालक जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला दवाखान्यात न नेता किंवा पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला.लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर करण्यात आला असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात BNS कलम 281, 106(1), 125(a)(b), तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम 184, 134(a)(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास स.पो.फौ येळे हे करत असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.