धारणी तालुक्यातील टाकरखेडा गावात कृत्रिम पाणीटंचाई

सचिन इंगळे (प्रतिनिधी) धारणी : धारणीपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर असलेल्या दिया ग्रामपंचायत अंतर्गत टाकरखेडा गावातील नागरिक गेल्या आठवड्यापासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत.गावात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एक विहीर असून ती कार्यान्वित आहे, मात्र मोटारीतील किरकोळ बिघाडामुळे संपूर्ण योजना ठप्प झाली आहे. यामुळे संपूर्ण गावात एकमेव हातपंपावर नागरिक रात्रीपासूनच रांगा लावून पाणी भरत आहेत.
काहींना पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये वादही होत आहेत. या परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विहिरीत पाण्याचा मुबलक साठा असतानाही केवळ मोटारीच्या दुरुस्तीसाठी वेळेत पावले उचलली गेली नसल्याने ही कृत्रिम पाणीटंचाई उद्भवली आहे. ग्रामस्थांच्या मते, मोटारीची दुरुस्ती ही एका दिवसाचे काम असून दुसऱ्याच दिवशी पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला असता. मात्र,ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांना जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मोटार दुरुस्त करावी आणि गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.