टेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

झिरो माईल’ होणार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत: मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई/नागपूर  : नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही कामे महानगराच्या चौफेर विकासाला हातभार लावणारी आहेत. यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित कामे तत्काळ सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अखंड भारताचा केंद्रबिंदू असलेले ‘झिरो माईल’ हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरावे अशा पद्धतीने त्या परिसराचा विकास करण्याची सूचना त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाशी संबंधित कामांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नागपूर शहराच्या आणि अखंड भारताच्या केंद्रस्थानी असलेले झिरो माईल स्टोन येथे सध्या पर्यटक येतात, तथापि तेथे त्यांनी थांबावे यासाठी या परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मान्यता दिली. या परिसरातील जागा राज्य शासनाच्या अखत्यारित असून येथे अखंड भारत कसा होता ? त्यावेळी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूर केंद्रस्थानी कसे आले याबाबचा इतिहास दर्शविणारे एक्सपिरियन्स सेंटर तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एकूण 45 कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पात नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून संग्रहालय, आवश्यक सोयी सुविधा आणि वाहन तळ तयार करण्यात येईल, तसेच भविष्यात महानगरपालिकेमार्फत याची देखभाल दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व कामे दर्जेदार व्हावीत- चंद्रशेखर बावनकुळे

कामठी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्यावसायिक पद्धतीने बांधकाम करण्यात येणार आहे. येथे 7 हजार कंत्राटी कामगारांसाठी घरे बांधण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने हे काम हाती घेऊन हा प्रकल्प तातडीने सुरू करावा, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. शासकीय मुद्रणालयाच्या जागेचाही पुनर्विकास करण्यात येणार असून तेथे मुद्रणालयासह अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहराच्या विकासाची सर्वच कामे दर्जेदार व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

नागपूर शहरातील  स्ट्रीट प्रकल्प येथे परफॉर्मन्स गॅलरी तयार करण्यात येणार आहे. येथे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 20 हजार चौ. मीटरच्या या जागेत 6.2 लाख चौ.फुट जागेच्या विकासाला परवानगी मिळाली असून यातील 1.2 लाख चौ.फुट जागेत सभागृह बांधण्यात येईल, तसेच उर्वरित जागेत इतर सोयी सुविधा तयार करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

नागपूर शहराचे कारागृह कामठी तालुक्यातील बाबुलखेडाजवळ 81.6 एकर जागेत तयार करण्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामासाठी पालघर, तळोदा व दिल्ली येथे बांधलेल्या कारागृहाच्या आर्किटेक्टशी सल्लामसलत करुन जेल मॅन्युअलनुसार कार्यवाही करण्यात यावी, तसेच जेल सदनिका बांधण्यात याव्यात असे आदेश  मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

शहरातील मोरभवन आणि गणेशपेठ येथील बसस्टँडच्या पुनर्विकासाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मोरभवन येथे शहर बससेवा आणि खाजगी बस यांच्यासाठी तर गणेशपेठ येथे एसटी महामंडळाच्या बस आणि शहर बस यांच्यासाठी सुविधा निर्माण करुन पुनर्विकास करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. याचबरोबर डिक दवाखाना, कॉटन मार्केट, दहीबाजार, इतवारी बाजार, नेताजी मार्केट, संत्रा मार्केट आदी परिसरांचा विकास करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

‘नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास तत्वतः मान्यता

‘नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली. हा प्रकल्प  नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचाद्वारे संकल्पित करण्यात आला आहे. एनएमआरडीएच्या हद्दीत हे शहर होणार असून यात स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान कंपन्या व आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही या शहरातील मुख्य वैशिष्ट्य असेल. प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कूलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू व टेलिकॉम यांसारख्या सर्व मूलभूत नागरी सुविधा एकत्रितपणे पुरवेल. खोदकामविरहित व भविष्यातील गरजांना अनुकूल असे शहर साकारले जाईल. या प्रकल्पामुळे आयटी, वित्त व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, एकात्मिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक सुलभता व मजबूत प्रशासन मॉडेल यांच्या जोरावर हे शहर नागपूरच्या आर्थिक महत्त्वाला नव्याने परिभाषित करेल, अशी माहिती एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी यावेळी दिली.

या बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर,  मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. गोविंदराज, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त संजय मीना, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजत चौधरी, नागपूर जिल्हाधिकारी बिपीन इटनकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.