
लोणंद एसटी स्थानकावर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गांधीनगरचे व्यापारी विनोद चावला यांची तब्बल पन्नास हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद चावला हे गांधीनगर येथील कापड व्यापारी असून लोणंद येथील व्यापाऱ्यांकडे मालाचे पैसे वसूलीसाठी आले होते. वसूली झाल्यानंतर ते पुढे नीरा येथे व्यापाऱ्यांकडे जात असताना बस पकडण्यासाठी ते लोणंद एसटी स्थानकावर आले. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिश्यातून रोकड लंपास केली.
घटनेनंतर व्यापारी चावला यांनी तत्काळ लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी लोणंद पोलिसांकडून स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.
या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.