मुंबई विमानतळावर पावणेआठ कोटींच्या कोकेनसह परदेशी प्रवासी अटकेत

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी सुमारे ७८५ ग्रॅम कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे पावणे आठ कोटी रुपये किंमत आहे. या प्रकरणात एका परदेशी प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी युगांडामधून भारतात आला होता. त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते.
मुंबई कोकेनचे वितरण केंद्र
मुंबई व दिल्लीत येणारा कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधिक आहे. उच्चभ्रू घरातील तरूणांकडून कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रिकी देशांतून कोकेनची सर्वाधिक तस्करी होते. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे. कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमधील नागरिकांचा वापर करण्यात येत होता. सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर करण्यात येत आहे. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई आणि मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन आणण्यात येते. भारतात राहून बेकायदेशीर कामे करण्यासाठी हे तस्कर नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करत आहेत.