चक्क चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र निघाले बनावट!
अचलपूरच्या तरुणाविरुद्ध गुन्हा : गाडगेनगर पोलिस ठाण्यात एफआयआर

अमरावती : ग्रामीण पोलिस मुख्यालयातील विशेष शाखेकडे सादर केलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनावट निघाले. ७ एप्रिल रोजी दुपारी तो प्रकार घडला. याप्रकरणी विशेष शाखेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गजानन दौलतराव सावरकर (४२, महिराबपुरा, अचलपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी कर्मचारी या ग्रामीण पोलिस मुख्यालयी चारित्र्य पडताळणीचे कामकाज पाहतात. ७ एप्रिल रोजी त्या कर्तव्यावर हजर असताना गजानन सावरकर याने त्याच्याकडील कलर प्रिंट काढलेले प्रमाणपत्र सादर करून त्यावर कार्यालयीन शिक्का मागितला. ते पाहून त्या महिला कर्मचाऱ्याला शंका आली. त्यांनी प्रमाणपत्रावरील जावक क्रमांक, अप्लिकेशन आयडी, दिनांक तपासले असता, त्यातील कुठलाही संदर्भकार्यालयीन कामकाजात जुळला नाही. पोलिसांच्या विशेष शाखेकडून एका विशिष्ट क्रमाने प्रमाणपत्र दिले जाते. त्यात डिजिटल स्वाक्षरी नसते. ते कृष्णधवल या रंगात दिले जाते. हे ज्ञात असल्याने त्या महिला कर्मचाऱ्याने ती बाब विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश पाटील यांना सांगितली.
ते चारित्र्य प्रमाणपत्र देवडी अचलपूर येथील पेट्रोल पंपचालक खनक अग्रवाल यांनी आरोपीला कलर प्रिंट काढून आणून दिल्याचे सांगितले. त्यातून आरोपीने चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनावट दस्तऐवजाचा वापर करून बनविल्याचे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.