अखेर विकीची सुपारी दिली कुणी? ‘त्या’ हल्लेखोरांना वाढीव पीसीआर
बिलालला सोडले; पोलिसांचे पथक अन्वर हुसेनच्या मागावर

अमरावती : वसंत चौकस्थित विकी मंगलानी याच्या पान मटेरियल दुकानाच्या आत ४ एप्रिल रोजी रात्री गोळीबार झाला होता. त्याप्रकरणी, कोतवाली पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून लागलीच तीन हल्लेखोरांना देखील पकडले होते. त्या तीनही हल्लेखोरांना आता ११ एप्रिलपर्यंत वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. मात्र, घटनेच्या पाच दिवसानंतरही विकी मंगलानीची सुपारी कुणी दिली, ते कोतवाली पोलिस उलगडू शकलेले नाही. कोतवाली व गुन्हे शाखा पोलिसांनी अन्वर हुसेन या नव्या मास्टरमाइंडचा कसून शोध चालविला आहे. तो शहरातून पसार झाला आहे.
जयभोले केंद्र या पान मटेरियल दुकानाच्या आत देशी कट्टयातून फायर केल्याप्रकरणी कोतवालीच्या डीबीने तीनही हल्लेखोरांना ४ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास अकोला रोडवरील बेलोरा टी-पॉइंट येथून अटक केली. मो. आसिफ नूर मोहम्मद (२६, रा. रजानगर, बडनेरा), अंकुश शेंडे (२७, रा. सोनगाव, ता. चांदूर रेल्वे) व अ. शकील अ. सत्तार (४२, रा. टांगापुरा, चांदूर रेल्वे) या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा व मोबाइल जप्त केला होता. त्यांना ५ एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले होते. त्यांना ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती मुदत संपत असल्याने बुधवारी पुन्हा त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. त्यांना ११ एप्रिलपर्यंत वाढीव पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
म्हणे, बिलालची चौकशी सुरूच बिलालने आपल्याला विकीची सुपारी दिली असल्याची माहिती वजा कबुली त्या हल्लेखोरांनी पोलिसांना दिली होती. त्याआधारे कोतवाली पोलिसांनी बिलालला शुक्रवारी रात्रीच ताब्यात घेतले. त्याचे बयान नोंदविले. दुसऱ्या दिवशी विकी
मंगलानीकोतवालीत हजर झाला. मात्र, त्याने हल्लेखोरांची कबुली खोटी ठरविली. बिलाल आपली सुपारी देऊच शकत नाही, असे विकीने सांगितले. आता अन्वर हुसेन हे नवे नाव समोर आले आहे. त्यानेच विकीची सुपारी दिल्याचा दावा समोर आला आहे.
तिनही हल्लेखोरांना ११ एप्रिलपर्यंत वाढीव पोलिस कोठडी मिळाली आहे. बिलालची चौकशी करण्यात आली. कोतवाली पोलिस व गुन्हे शाखेची पथके अन्वर हुसेनच्या शोधात आहे. तो सापडलेला नाही.
मनोहर कोटनाके, ठाणेदार, सिटी कोतवाली