डोसाच्या गाडीवर दरोडा; सलमानचे क्राइम पार्टनर केले गजाआड!
रोख रक्कम हिसकावून महिलेच्या विनयभंगाचे सुबोध कॉलनीतील प्रकरण

अमरावती :एमपीडीएअंतर्गत कारागृहातील स्थानबद्धता संपुष्टात येताच एका कुख्यात आरोपीने जबरी चोरी व एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार कठोरा नाक्याजवळील सुबोध कॉलनी येथे ४ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास घडला होता. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी सलमानव्यतिरिक्त तीन आरोपींना अटक केली.
जावेद खा अनवर खा (वय २२, रा. यास्मिननगर), वसीम खान शकील खान (२३, रा. गुलिस्तानगर), अहफाज खान शफाकत खान (३१, रा. नूरनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गाडगेनगरचे ठाणेदार ब्रह्मगिरी यांच्या नेतृत्वातील डीबी टीमने ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सलमान शेख अतिक (२७, रा. यास्मिननगर) व त्याच्या पाच साथीदारांविरोधात शुक्रवारी रात्री जबरी चोरी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी विनोद गाढवे हा डोसा विक्रीचा व्यवसाय करतो. शुक्रवारी रात्री व्यवसाय करत असताना शेख सलमान व अन्य पाच जण दुचाकीने तेथे आले. तथा सामानाची फेकफाक करून शिवीगाळ केली. दगड मारून गाढवे यांना जखमी केले, व चाकूने जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी गल्ल्यातील ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतली. तथा त्यांच्या एका महिला नातेवाइकाचे कपडे फाडले. धुमाकूळ घातल्यानंतर तेथून ते रफूचक्कर झाले.
यांनी केली कारवाई
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील व गाडगेनगरचे ठाणेदार ब्रह्म गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक मनोज मानकर, हवालदार भारत वानखडे, जावेद अहमद यांच्या पथकासह पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या स्पेशल स्कॉडने ही कारवाई केली.