‘राज ठाकरे, मराठी भाषेच्या नावाखाली काय डील झाली?’, आंदोलन थांबवल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं!

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बँकेत मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी सुरु केलेलं आंदोलन तूर्तास थांबवण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे. मराठी भाषेच्या नावाखाली काय डील झाली? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना विचारलाय. काय आहे हे प्रकरण? समजून घेऊया.
राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलं असून त्यातून हे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यातील मेळाव्यात मनसैनिकांना बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा वापर होत आहे याची खात्री करावी, आणि तसं होत नसेल तर जाब विचारावा असं आवाहन केलं होतं. यानंतर मनसैनिकांनी बँकेत जाऊन आंदोलनं सुरु केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी हे आंदोलन थांबवण्यास सांगितलं आहे. आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कायदा हातात घेऊ नका, अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला होता. त्यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की”.