क्राइमटेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे कठोर कारावासाची शिक्षा

दहा वर्षीय बालिकेवर खेळण्याचा बहाणा करून दोन वेळा अत्याचार करणाऱ्या आणि संबंधित मुलीस मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या नराधम युवकास २० वर्षे कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

कराड : दहा वर्षीय बालिकेवर खेळण्याचा बहाणा करून दोन वेळा अत्याचार करणाऱ्या आणि संबंधित मुलीस मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या नराधम युवकास २० वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरा यांनी ही शिक्षा सुनावली. बापू उर्फ नितीन रमेश पाटोळे (३० रा. वारूंजी, ता. कराड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना नोहेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यानची आहे. याबाबत पिडित मुलीने सांगितल्यावर आईने तक्रार दाखल केली होती.

याबाबत सरकारी वकील आर. सी. शहा यांनी दिलेली माहिती अशी की, १५ नोहेंबर २०२३ रोजी पीडित बालिका अंगणात खेळत असताना शेजारी राहणाऱ्या बापू पाटोळेने खेळण्याच्या बहाण्याने बालिकेला घरात नेले व तिच्याशी जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर दोन महिन्यांत दोन वेळा बालिकेवर हा अत्याचार झाला. तसेच याबाबत कोणास सांगितले तर मारून टाकण्याची धमकी बापू पाटोळेने बालिकेला दिली.

यानंतर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी दोन वाजता बालिका अंगणात खेळत असताना बापू पाटोळेने पीडित बालिकेला घरी बोलावले. मात्र, ती घाबरून घरी पळत गेली व तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. बालिकेच्या आईने याबाबत कराड शहर पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. पाटील यांनी सदर घटनेचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित बालिका, तिची आई व वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस २० वर्षे कठोर कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या महत्वपूर्ण खटल्यात सरकारी वकील ॲड. आर. सी. शहा यांना ॲड. रिचा शहा, ॲड. ऐश्वर्या यादव, ॲड. कोमल लाड यांनी सहकार्य केले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. भोसले यांनी सहकार्य केले.
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.