Wardha : खूनाचे बिंग फुटले, दोघांना ठोकल्या बेड्या; मुलाने काढला बापाचा काटा

आष्टी :- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या बामनपेठ जंगल परीसरात आढळून आलेल्या प्रेताचा उलगडा झाला असून मुलानेच बापाचा सहकार्याच्या मदतीने खून करून जंगलात टाकुन देण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आष्टी पोलिसांनी अखेर दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रेवनाथ कोडापे(२९ ) रा.मार्कंडा देव, ता. चामोर्शी,लखन देवराव मडावी (२५), रा. ता.जि. गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी भाऊजी सिडाम हे दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ०७.३० वाजताच्या सुमारास बामनपेठ येथिल जंगल परिसरात गेले असता त्यांना एका ठिकाणी कुजण्यास सुरुवात झालेले अनोळखी प्रेत मिळुन आले. त्यांनी त्याबाबतची माहिती पोलीस स्टेशन आष्टी येथिल पोलीसांना दिली.
मुलानेच बापाचा सहकार्याच्या मदतीने केला खून
पोलीसांनी नागरिकांना माहिती देऊन त्या मृत व्यक्तीची ओळख पटवली. या घटनेसंदर्भात आष्टी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयाने आपला अहवाल आष्टी पोलिसांना सादर केला. मृतक रेवनाथ लक्ष्मण कोडापे (५५) रा. मार्कंडा देव हा नेहमी भांडण करीत असल्याच्या कारणावरून त्याचा खून करण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्याचे १६ एप्रिल २०२५ रोजी अपहरण केले. त्याला ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह बामनपेठ येथिल जंगल परिसरात आणुन टाकला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपींना अटक केली.आष्टी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरोधात कलम १०३(१), १४०(१), २३८, ३(५) बि.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे करीत आहेत.