Parbhani : खा. संजय जाधव यांनी केली १० कोटीची तरतुद प्रत्यक्ष कामाला सुरुवात

परभणी :- जांभुळबेट संवर्धन समितीच्या मागणीला खा. संजय जाधव यांच्या विकास निधीतून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. निसर्गरम्य जांभूळ बेटचा कायापालट होणार असल्याची माहिती जांभूळबेट संवर्धन समितीचे कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी दिली आहे.
जांभुळबेटचा होणार कायापालट
परभणी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असणारे आणि पर्यटकांना नेहमीच साद घालणारे जांभुळबेट हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. परभणी जिल्ह्यातील पालम आणि पूर्णा तालुक्यांना स्पर्श करून वाहणार्या गोदावरी नदीच्या मध्यभागी असणारे हे बेट म्हणजे जैवविविधतेचा उत्तम असा नमुना होय. मध्यंतरीच्या काळात जांभूळ बेटाला पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सर्व बाजूंनी नुकसान पोहोचले होते. पर्यटकांना तिथे पोहोचण्यासाठी कसलीही व्यवस्था नव्हती. मात्र जांभुळबेट संवर्धन समितीने कृषिभूषण कांतराव झरीकर यांच्या पुढाकारातून जांभूळ बेटावर अनेक सुविधा निर्माण केल्या. दिग्रस बंधार्यामुळे भरपूर पाण्याची साठवण होत आहे. समितीने बोटीची व्यवस्था केली. सोयी सुविधा निर्माण झाल्यामुळे पर्यटकांचा ओढा मागील चार वर्षापासून वाढला आहे. आता खा. संजय जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून १० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
खा.जाधव यांच्या निधीतून होणार विकास कामे
खा. संजय जाधव यांच्या विकास निधीतून मूलभूत सुविधा पर्यटकांसाठी निर्माण होतील आणि पर्यायाने पर्यटकांची पाऊले जांभूळ बेटाकडे निश्चित वळतील अशी आशा निर्माण झाली आहे. सोमेश्वर ते जांभुळबेट हा मुख्य रस्ता तसेच जांभूळ बेटावर,पेव्हर ब्लॉक, स्वच्छतागृह, वृक्षारोपण, शेड आदि सुविधांसाठी हा विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जांभुळबेट संवर्धन समिती आणि परिसरातील नागरिकांनी खा.संजय जाधव यांचे आभार व्यक्त केले आहेत.