आजचा दिवस गारपिटीचा? राज्याच्या अनेक भागांसाठी हवामान विभागाचा इशारा

खरा संवाद प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अकरा जिल्ह्यांना नारंगी तर उर्वरित जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारनंतर पाऊस आणि गारपिटीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातून येत असलेले बाष्पयुक्त वारे आणि तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग तयार झाल्यामुळे पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. आज, बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर राहण्याची भीती आहे. विशेषत: अमरावती, चंद्रपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्याला नारंगी आणि सोलापूर वगळता उर्वरित महाराष्ट्राला पिवळा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रावर जमिनीपासून ९०० मीटर उंचीवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरातून जमिनीपासून तीन किलोमीटर उंचीपर्यंत बाष्पयुक्त वारे येत आहेत. तर अरबी समुद्रातून तीन किलोमीटरहून जास्त उंचीवरून बाष्पयुक्त वारे येते आहेत. अशा स्थितीत उंच ढगांची निर्मिती होऊन गारपीट होण्याचा धोका आहे.
मंगळवारी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली.