कृषीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

लष्करी वालाचे चित्रांगी दाणे; वरूडमध्ये प्रत्येकाच्या घरी वर्षातून एकदा तरी बनतेय पौष्टिक भाजी!

पूर्वीपेक्षा लष्करी दाणे कमी उपलब्ध होत असले तरी वरूड तालुक्यात प्रत्येकाच्या घरी वर्षातून एकदा तरी लष्करी दाण्यांची चवदार भाजी बनतेच.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. जगभर ओळखली जाणारी नागपुरी संत्री ही वरूडचीच. अशात लष्करी दाण्यांची भाजी म्हणजे वरूड तालुक्याचं वैशिष्ट्य. लग्न सोहळा, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये लष्करी दाण्यांची भाजी हमखास असतेच. पूर्वीपेक्षा लष्करी दाणे कमी उपलब्ध होत असले तरी वरूड तालुक्यात प्रत्येकाच्या घरी वर्षातून एकदा तरी लष्करी दाण्यांची चवदार भाजी बनतेच.

या दाण्यांना अनेक नावं : शेंदुर्जना घाट, टेंभुर्खेडा आणि जरूड या गावात या दाण्यांच्या वेली शेतात मोठ्या प्रमाणात आहेत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापर्यंत या शेंगा वेलीवर बहरतात. या शेंगामधील दाणे जितके चवदार तितकेच त्याचे टरफलं पण चविष्ट असून उन्हाळ्यात त्यांना सुकवून त्याचीही भाजी केली जातेय. भाजून देखील दाणे आणि टरफलं खाल्ली जातात. वालाची शेंग सर्वत्र मिळते. मात्र या विशिष्ट वालाच्या दाण्यांना दुधी दाणे, चित्रंगी दाणे, लष्करी दाणे, पोपटी दाणे अशी ओळख आहे. महाराष्ट्रात वरूड तालुक्यासह कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात हे दाणे मिळतात. त्यांना त्या भागात स्थानिक लोकं विविध नावांनी त्याचा उल्लेख करतात.

 

दाण्याचं असं आहे वैशिष्ट्य : “लष्करी दाण्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट्स देखील विपुल आहेत. यासोबतच हे दाणे अँटी ऑक्सिडेंट आहेत. हे दाणे अतिशय चवदार असून कावळ्या शेंगांमधील दाणे भाजून खाल्ले तर अधिक चवदार लागतात”, अशी माहिती वरुड तालुक्यातील जरुड गावाचे रहिवासी सेवानिवृत्त महसूल उपयुक्त शेषराव खाडे यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना दिलीय.

सध्या बाजारात काय आहे किंमत? : “आरोग्याच्या दृष्टीनं खाण्यास महत्वाचे आणि चवदार असणारे लष्करी दाणे बाजारात ६०० रुपये किलो या दरानं मिळतात. तसंच शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मुख्य पिकांच्या मध्ये या लष्करी डब्यांच्या वेली वाढवल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते”, असं देखील शेषराव खाडे म्हणाले. याशिवाय, “पूर्वी वरूड तालुक्यात जवळपास सर्वच भागात या लष्करी दाण्यांचं उत्पन्न घेतलं जायचं. या वेलीवर मावा नावाचा रोग मोठ्या प्रमाणात होतो. हा रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढत असल्यानं आता या दाण्यांचं फारसं उत्पन्न घेतलं जात नाही. काळजी घेऊन या शेंगांची वेल कुंपणावर लावली तरी याचा फायदा होऊ शकतो”, असंही शेषराव खाडे यांनी म्हटलंय.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.