क्रीडामंत्र्याद्वारा जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

अमरावती : राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी जिल्हा क्रीडा संकुलाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील विविध क्रीडा सुविधांची पाहणी करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.
क्रीडामंत्री भरणे यांनी संकुलातील खेलो इंडिया आर्चरी सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्क्वॅश कोर्ट, ज्युदो, कुस्ती, कबड्डी,बॅडमिंटन बहुउद्देशीय हॉल, जिम, कार्यालय आणि बांधकाम प्रगतिपथावर असलेल्या क्रीडा वसतिगृहाच्या कामाची पाहणी केली. अमरावती जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करता येतील, अशा प्रकारच्या विविध क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या जातील. या संकुलातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव, तालुका क्रीडाधिकारी आर. व्ही. वडते, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आदी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.