अप्पर वर्धा धरणापुढील पुलाची उंची केव्हा वाढणार?

मोर्शी अप्पर वर्धा धरणासमोरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसांत वाहतूक बंद करण्याची वेळ येणार नाही, अशा आशयाचे लेखी निवेदन ज्येष्ठ नागरिक मुरलीधर विरूळकर यांनी खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यामार्फत केंद्रीय भूपृष्ठ दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना रवाना करण्यात आले.
मोर्शीपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेले अप्पर वर्धा धरण हे जिल्ह्यात सर्वांत मोठे धरण म्हणून गणले जात आहे. हे अप्पर वर्धा धरण अस्तित्वात आले तेव्हापासून या
धरणासमोरील पुलाची उंची अगदी कमी आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अप्पर वर्धा धरण ओव्हरफ्लो झाल्यास धरणाचे तेराही गेट उघडण्यात येतात. परिणामी
या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असताना मोर्शी-आष्टी-तळेगाव-आर्वी या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नाहक खोळंबा सहन करावा लागतो.
रुंदी वाढविण्याचीही मागणी अप्पर वर्धा धरणाच्या पुढ्यात असलेला पूल अगदी जुना झाला असून दळणवळणाच्या साधनांच्या दृष्टीने त्याची रुंदीसुद्धा खूपच कमी आहे. त्यामुळे या पुलावर अनेकदा अपघातसुद्धा घडत आहेत. धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर येथील नयनरम्य दृश्य बघण्यासाठी व अंगावर पाण्याचे तुषार घेण्यासाठी देशभरातील पर्यटकांची मोठी गर्दी असते. काही जण पुलापर्यंत पोहोचतात. त्यावेळीसुद्धा अपघात होऊन कित्येक जणांचा बळी गेला आहे.
पावसाळ्यात पुलामूळे कामाचा खोळंबा वर्धा व अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व आर्वी तालुक्यातील नागरिकांना कामानिमित्त याच पुलावरून दररोज ये-जा करावी लागते; परंतु पावसाळ्यात रस्ता बंद असल्यामुळे अधिकचा फेरा करीत वा नियोजित कामे प्रलंबित ठेवून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
शासनाला प्रस्ताव सादर पूर्तता केव्हा होणार? अप्पर वर्धा धरणाच्या पुलाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी शासनाकडे सादर केला आहे. त्याला अद्याप मंजुरी प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात पुलाचे बांधकाम केव्हा होते, याची दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना प्रतीक्षा आहे.