सुपरमध्ये मूत्रपिंड विकाराच्या ३,२६६ शस्त्रक्रिया
वर्षभरात २९ हजार ४२२ रुग्णांची राहिली ओपीडी

अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे विविध गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया होत आहेत. यामध्ये २०२४-२५ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मूत्रपिंड विकाराच्या एकूण ३ हजार २६६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर, रुग्णालयातील मूत्रपिंड विकार विभागातील वर्षभरातील ओपीडी ही २९ हजार ४२२ रुग्णांची राहिली आहे.
यामध्ये २० हजार ७५२ पुरुष, तर ८ हजार ६७० महिला रुग्ण असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय हे अमरावती विभागातील नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. या ठिकाणी मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, लहान बाळांवरील विविध शस्त्रक्रिया, हृदयविकार शस्त्रक्रिया मोफत होत आहेत. याठिकाणी मूत्रपिंड विकार ज्यामध्ये मूत्रपिंडातील खडे, मूत्राशयाचा कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग, लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, मूत्रपिंड निकामी होणे अशा विविध आजारावरील उपचार होत आहेत. मूत्रपिंड रक्तातील कचरा आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करतात. तसेच रक्तातील इलेक्ट्रोलाइट्स आणि अॅसिड-बेसची पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. सुपरमध्ये वर्षभरात मूत्रपिंड विकाराच्या तब्बल २९,४२२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १७,५४९ रुग्ण हे रुग्णालयात भरती होते, तर त्यातील ३२६६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागल्याची माहिती रुग्णालयाने दिली.
५३६ शस्त्रक्रिया सुप्रा मेजर सुपरमध्ये झालेल्या मूत्रपिंड विकाराच्या एकूण ३२६६ शस्त्रक्रियेमध्ये ५६६ शस्त्रक्रिया या सुप्रा मेजर आहेत. १३८० या मेजर तर १३५० या मायनर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
वर्षभरात १४ मूत्रपिंड प्रत्यारोपण सुपरमध्ये २०२४-२५ या एक वर्षात मूत्रपिंड निकामी झालेल्या १४ रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. २०१८ पासून याठिकाणी मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या ५२ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.