किरकोळ वादातून गर्भवतीसह पतीला अमानुष मारहाण
दात पाडले : डोमा येथील आशा वर्कर; पती, मुलींविरुद्ध गुन्हा

चिखलदरा : शौचालयाच्या पाण्याच्या वादातून तालुक्यातील डोमा येथे गर्भवती महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आली. यामध्ये महिलेच्या पोटावर आणि गुप्तांगाला जखमा झाल्या. या प्रकरणात चिखलदरा पोलिसांनी आशा वर्कर, तिचा पती व मुलींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, राणी अजय अथोटे (२५) व पती अजय बन्सी अथोटे (३२, रा. डोमा) अशी जखमींची नावे आहेत. बबलू जगलाल अथोटे व आशा वर्कर संध्या यांच्यासह दोन मुलींचा आरोपींमध्ये समावेश आहे. बुधवारी राणी व अजय हे त्यांच्या घराच्या जागेवर शौचालयाकरिता खोदलेल्या खड्ड्यात सिमेंट काँक्रीटचे काम मजुरांकडून करून घेत होते. शेजारी राहणारा चुलत सासरा बबलू अथोटे याने या सिमेंटच्या कामावर नालीच्या पाइपमधून पाणी सोडल्याने ते खराब झाले. जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर बबलू, त्याची पत्नी संध्या व दोन मुलींनी गर्भवती महिलेला ओढाताण करून मारहाण केली. जमिनीवर कोसळताना दगड लागल्याने राणीचे दोन दात तुटले तसेच अजयला वीट व काठीने मारून जखमी करण्यात आले. झटापटीत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली. पोलिसांनी राणीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
दरम्यान, तक्रारीत राणी अथोटे ही गर्भवती असल्याचे नमूद असले तरी त्याबाबत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा चिखलदरा पोलिसांना आहे.
एसपींनी घेतली दखल पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी घटनेची दखल घेतली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांनीसुद्धा संबंधित आशा दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.