ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गाढवी नदिवर बॅरेज बांधण्याचा प्रस्ताव अद्यापही धुळखातच; ‘पाणी अडवा -पाणी जिरवा ’संकल्पनेला हरताळ

देसाईगंज  :- लगतच्या गोंदिया जिल्ह्यातुन गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज, आरमोरी या दोन्ही तालुक्यात वाहणारी गाढवी नदी येथील शेतकर्‍यांसाठी सिंचन सुविधेसह पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरू शकते. मात्र यावर ठराविक अंतरावर बॅरेज बांधुन पाणी अडविणे गरजेचे आहे. या करीता येथील नागरीकांनी लोकप्रतिनिधींना अवगत करून देऊन समस्या सोडविण्या करीता पाठपुरावा केला असता घेतलेले ठराव देखील अद्यापही धुळखात पडून असल्याने ‘पाणी अडवा – पाणी जीरवा’ ही येथील शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी ठरु पाहणार्‍या योजनेला शासकीय स्तरावरुन हरताळ फासल्या जात असल्याने याबाबत परिसरातील शेतकरी (Farmer) वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नदीचे वाहते पाणी अडवून जीरवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे

उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने येथील नागरिकांच्या उपजीविकेचे एकमेव साधन म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. देसाईगंज तालुक्यासह आरमोरी तालुक्याच्या काही भागातून गाढवी नदी वाहत असल्याने नदीचे वाहते पाणी अडवून जीरवण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. दरम्यान या नदीवर काही ठराविक अंतरावर बारमाही रस्त्याने गावे जोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या जुन्या छोट्या मोठ्या पुलांचे पिल्लर धुळखात पडुन असल्याने याचा आधार घेत बॅरेज बांधकाम करण्याची येथील नागरीकांकडून मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तत्कालीन आ. कृष्णा गजबे यांनी वारंवार पाठपुरावा देखील केला होता. मात्र बॅरेज बांधकामाचे भिजत घोंगडे अद्यापही कायम  आहे.

या उपक्रमाकडे शासकीय स्तरावरुन लक्षच देण्यात येत नसल्याने व अनावश्यक त्या ठिकाणी कोल्हापूरी बंधारे, शेततळी यावर अनावश्यक खर्च केल्या जात असल्याने शासनाचा कोट्यावधीच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.