बीएसएफचा जवान देतोय मृत्यूशी झुंज; उपचाराच्या खर्चासाठी दानदात्यांना मदतीचे आवाहन

गडचिरोली :- देशासाठी जीवाची बाजी लावणारा बीएसएफ जवान (३५) रा. चापलवाडा ता. चामोर्शी हा सद्या मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी दानदात्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यातील सिर्सी – कोजबी मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघाताने त्यांच्या आयुष्यावर अकल्पित संकट कोसळले आहे. मित्रांसोबत स्नेहभोजन आटोपून दुचाकीवरून परतताना रस्त्यावर दुचाकी घसरल्याने त्यांच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली. नागपूर येथील ऑरियस हॉस्पिटलमध्ये गेल्या १२ दिवसांपासून ते उपचार घेत असून, त्यांच्यावर आतापर्यंत चार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा होत असताना अचानक रक्तस्तावामुळे आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागली.
नागपूर येथील ऑरियस हॉस्पिटलमध्ये गेल्या १२ दिवसांपासून उपचार सुरु सुरु
आजपर्यंतच्या उपचारांसाठी तब्बल १२ लाख रुपये खर्च झाले असून, मित्र, नातेवाईक आणि कर्जाऊ रकमेतून हा खर्च कसाबसा उभा करण्यात आला. मात्र, डॉक्टरांच्या अंदाजानुसार, प्रवीण यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, पूर्ण बरे होण्यासाठी किमान एक महिना लागेल आणि पुढील उपचारांसाठी १० लाख रुपये पर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे प्रवीण यांच्या कुटुंबाची ऐपत आता संपली असून, हा खर्च पेलणे त्यांना शक्य नाही प्रवीण हे त्रिपुरा येथे बीएसएफ बटालियन ८९ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून देशाची निष्ठेने सेवा करतात. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते कुटुंबाचे एकमेव आधारस्तंभ आहेत. वडिलांचे छत्र हरपलेल्या या कुटुंबावर उपचारांचा आणि उदरनिर्वाहाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण यांचे मित्र, कुंभार समाज बांधव आणि नातेवाईक यांनी आतापर्यंत खंबीरपणे साथ दिली, परंतु वाढता खर्च पाहता आता समाजाने सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.