वर्षभरात सुपर स्पेशालिटीत दगावले ५०३ रुग्ण
२७ बालकांचा समावेश, १६३ महिलाही दगावल्या

अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे उपचारासाठी दाखल झालेल्या ५०३ रुग्णांचा २०२४-२५ या एक वर्षाच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. यामध्ये शून्य ते पाच वर्ष वयोगटातील २७ बालके आहेत. त्याच बरोबर भरती झालेल्या १६३ महिलांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालय प्रशासनाने केली आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे मूत्रपिंड विकार उपचार व शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण,प्लास्टिक सर्जरी अर्भक शस्त्रक्रिया, कर्करोग शस्त्रक्रिया, हृदयरोग शस्त्रक्रिया, मेंदूविकार शस्त्रक्रिया, असंसर्गजन्य आजारावरील उपचार करण्यात येतात. त्यामुळे येथे रोज शेकडोच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या ठिकाणी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून तसेच मध्य प्रदेशातूनही रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी दाखल होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षभरामध्ये या ठिकाणी २३ हजार ८९७ रुग्ण हे उपचारासाठी भरती झाले होते. यातील काही रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. तर, भरती असलेल्या काही रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
एक महिन्याच्या आतील २३ बालकांचा मृत्यू विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे मृत्यू झालेल्या एकूण २७बालकांमध्ये आठ दिवसांच्या १४ बालके तर एक महिन्याच्या आतील एकूण २३ बालकांचा मृत्यू झाला आहे. एक वर्षाच्या आतील ३ तर एक ते पाच वर्षातील १
बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.