वाडा पंचायत समितीमधील लाचखोर तांत्रिक सहाय्यकाला अटक; पाच हजारांची लाच घेताना पकडले

वाडा – वाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागातील तांत्रिक सहाय्यकाला पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. विहिरीच्या निधी मंजुरीसाठी त्याने ही लाच स्वीकारली आहे. ही कारवाई गुरुवारी १५ मे संध्याकाळी करण्यात आली असुन रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असुन पंचायत समितीमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.
मागील अनेक दिवसांपासून रोजगार हमी योजना विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप होता. या कारवाईने त्याला पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे. सुशील भिमराव कटारे (वय ३८) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असुन तो वाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी) या पदावर म्हणून कार्यरत आहे.
एका लाभार्थ्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील विहिरीकरिता पाच लाखांचा निधी मंजुरी देण्यासाठी या अधिकाऱ्याने स्वतःसाठी पाच हजारांचा व वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ हजार रुपये लाच देण्याची मागणी देखील केली होती. आधीच मिळणाऱ्या निधीमध्ये जेमतेम काम पूर्ण होऊन योजनेचे पैसे कसे तरी लाभार्थ्यांना मिळतात, त्यात या अधिकाऱ्यांना लाच द्यायची तरी कशी या प्रश्नाने लाभार्थी हा चिंतेत होता. अखेर लाभार्थ्याने ठाणे लाचलुचपत विभागाकडे या अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार नोंदविली होती.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी सुशील कटारे यांनी स्वतःसाठी पाच व वरिष्ठांसाठी १५ हजारांची लाचेची मागणी केली होती. मात्र लाभार्थी तक्रारदार यांच्याकडे केवळ पाच हजार रुपये असल्याने ही रक्कम सदर तांत्रिक सहाय्यक कटारे या अधिकाऱ्याने स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती.
त्यानुसार १५ मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी तक्रारदार हे लाचेची रक्कम आरोपी तांत्रिक सहाय्यक सुशील कटारे यांना देण्यासाठी गेले असता त्यांनी पाच हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली असल्याचे निष्पन्न झाले.