मासोद गावाला पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारा पुरवठा

चांदूर बाजार : तालुक्यातील मासोद या गावात पिण्याच्या पाण्यामुळे काही जणांची प्रकृती बिघडल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने याबाबत सतर्कता बाळगल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा प्रशासनाची चमू घटना समोर आल्यानंतर तत्काळ गावात दाखल झाली. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच इतर ठिकाणी आढळून आलेल्या बाबींचा अहवाल तयार केला. पाण्याची तपासणी करून बुधवारपासून गावकऱ्यांना वापराच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्यात येत आहे, पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे याकरिता टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. गावात आरोग्य विभागाचे पथक २४ तास उपलब्ध आहे. तत्पूर्वी, दूषित पाण्यामुळे गावातील १५ जणांची प्रकृती खालावली होती. मात्र, आता उपचार घेत असलेल्यांची प्रकृती देखील चांगली असल्याचे समजते.
आरओ तपासणार १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत अनेक ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आलेले आरओ प्लांट हे आज बंद आहेत. संबंधित ठेकेदारांनी बोगस आरओ प्लांट बसवून घोळ केला असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात आमसभेत आ. प्रवीण तायडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सर्व आरओ प्लांटची माहिती घेऊन कार्यवाही करणार असल्याचे बीडीओ आमझरे म्हणाले.
मद्यपी कर्मचाऱ्यांवर व्हावी कारवाई तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींमधील पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे, जेणेकरून काही आरोग्य समस्या असल्यास त्याचा त्रास इतरांना होणार नाही. काही ग्रामपंचायतींमधील मद्यपी कर्मचाऱ्यांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे झाले आहे.