मुंबईतून अमरावतीत डिलिव्हरी एमडी ड्रग पेडलरचे त्रिकूट जेरबंद
४० ग्रॅम एमडीसह ८.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्पेशल स्कॉडची कारवाई

अमरावती : मुंबईतून रस्ता मार्गाने एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिस आयुक्तांच्या स्पेशल स्कॉडने बडनेरा-अकोला मार्गावरून अटक केली. त्यांच्याकडून ४०.३४ ग्रॅम एमडी ड्रग्जसह कार, तीन मोबाइल व वजन काटा असा ८ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ९ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अब्दुल एजाज अब्दुल अजीम (वय ४७, रा. हबीबनगर, अमरावती), शाहरूख खान बिसमिल्ला खान (३०, रा. खुर्शीदपुरा, अमरावती) व अविनाश मनोज खांडेकर (२८, रा. जुनी वस्ती, बडनेरा) अशी अटक ड्रग पेडलरची नावे आहेत. मुंबईहून कारमधून अमरावतीला विक्रीसाठी एमडी ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती पीआय आसाराम चोरमले यांना मिळाली. त्या आधारे स्कॉडने बडनेरा-अकोला मार्गावर सापळा रचून एमएच २७ बीझेड २०११ ही कार अडविली. त्यावेळी कारमध्ये अब्दुल एजाज, शाहरूख खान व अविनाश हे तिघे होते. कारमध्ये एमडी ड्रग आढळले.
यंदाची पहिली कारवाई
स्पेशल स्कॉडने एमडीबाबत केलेली ही यंदाच्या वर्षातील पहिली कारवाई ठरली आहे. गतवर्षी एका कारवाईतून दोन आरोपींना अटक करून १.२० लाखांची एमडी जप्त करण्यात आली होती. तर सन २०२३ मध्ये पाच गुन्ह्यात १६ आरोर्पीना अटक करून १८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला होता. हे विशेष.
बडनेरा पोलिसांत गुन्हा दाखल आरोपींविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्पेशल स्कॉडचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे, उपनिरीक्षक तुषार गावंडे, युसूफ सौदागर, छोटेलाल यादव, रणजित गावंडे, निखिल माहुरे, आशिष डवले, निवृत्ती काकड, संजय भारसाकडे, अमोल मनोहर, नईम बेग, गजानन सातंगे यांनी केली.