‘त्या’ जबरी चोरीचा उलगडा; दोन कुख्यात डीबी स्कॉडकडून अटक
तलवार, कत्ता, रोखही जप्त : चाकुचा धाक दाखवून फायनान्स कर्मचाऱ्याला होते लुटले

अमरावती : पॅराडाइज कॉलनी भागात ४ एप्रिल रोजी सायंकाळी फायनान्स कंपनीत कार्यरत शिवकुमार सेलामुत्तू कौटर (४४, कर्नाटक, ह.मु. कॅम्प, अमरावती) यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४० हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. त्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांच्या डीबी पथकाने दोन कुख्यातांना अटक केली असून, त्यांच्याकडून तलवार, कत्ता व ५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आली आहे.
गाडगेनगर पोलिसांनी त्याप्रकरणी एमएच २७ सीई ५४८० या दुचाकीवरील तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. शिवकुमार हे आपल्या मित्रासमवेत जात असताना २५ वर्षे वयोगटातील तिघांनी त्यांची बाइक शिवकुमार यांच्या वाहनासमोर आणून अडविली व त्यांच्याकडील ४० हजार रुपये घेऊन पोबारा केला होता. तपासादरम्यान, गाडगेनगर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे शुभम नरेन्दू चौधरी (२२ वर्षे) व रोहन राजेन्दू माने (१९, दोघेही रा. चिंचफैल, अमरावती) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी पॅराडाइज कॉलनी येथील जबरी चोरीची कबुली दिली. दोन्ही आरोपींची पोलिस कोठडी घेण्यात आली. त्यांच्याकडून एमएच २७ सीई ५४८० क्रमांकाची दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली तलवार, कत्ता (लोखंडी चाकू) व गुन्ह्यातील पाच हजार रुपये असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त अरुण पाटील व गाडगेनगरचे ठाणेदार ब्रम्हा गिरी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिनेश दहादोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मनोज मानकर, पीएसआय दिनेश सुरपाम, अंमलदार नीलेश जुनघरे, गजानन बरडे, सागर धरमकर, सुशांत प्रधान, मतीन शेख, नितीन कामडी, हितीश वाठोडकर यांनी ही कारवाई केली.