माय-लेकाला त्रिशूल मारून केले जखमीं

दर्यापूर शहरातील : दीक्षाभूमी नगरात एका महिला व तिच्या मुलाला दगड व त्रिशूलने मारहाण करून जखमी करण्यात आले. मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अमरावतीला हलविले.माझ्या अंगणातून का जातेस, या मुद्द्यावरून दीक्षाभूमी नगरातील सुशीला लहानुजी तेलगोटे (५५) या महिलेसोबत वाद घालून दगड फेकून मारला. तो जबड्याला लागल्याने एक दात तुटला. तेवढ्यात मुलगा प्रशांत हा त्या ठिकाणी येताच आरोपीने त्यालासुद्धा मारहाणकरीत त्याला डोक्यावर त्रिशूल मारला. सुशीला यांच्या हाताला त्रिशूल लागल्याने ती सुद्धा जखमी झाली. या घटनेनंतर त्यांनी दर्यापूर ठाणे गाठले. तक्रारीनुसार, त्या गुरुवारी दुपारी ५ वाजता दरम्यान मजुरी आणण्यासाठी चंदा थोरात यांच्यासोबत नंदा वानखडे यांच्याकडे गेल्या. पैसे घेऊन सागर लहुपंचाग यांच्या घरासमोरील चर्चच्या जागेतून परत येत असताना, सागरने तुम्ही माझ्या घराच्या अंगणातून कशाला जाता, असे म्हणत शिवीगाळ केली. ही जागा चर्चची आहे, असे सुनावताच सागरने घरासमोर पडलेला दगड मारला. त्यामुळे त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर सागरने घरातून लोखंडी त्रिशुल आणले व सुशीला यांच्याकडे धावून गेला. त्रिशूल अडविताना तळहाताला जखम झाली. प्रशांत सोडविण्यास आला असता, सागरने त्याच्या डोक्यावर त्रिशूलने वार केले. त्याच वेळी अभिमान लहुपंचाग व अमोल लहुपंचाग यांनीही या माय-लेकाला थापडबुक्क्यांनी मारहाण केली.