मोबाइलसाठी हटकले मुलीने सोडले घर !

अमरावती : आईने मोबाइल व अभ्यासासाठी हटकल्याने १३ वर्षीय मुलीने घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार वरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी १० एप्रिल रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुलगी घराबाहेर पडली. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र ती मिळून आली नाही. अखेर तिच्या आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
८ एप्रिल रोजी आईने मोबाइल व अभ्यासाबाबत हटकले. तू केवळ मोबाइलच बघत राहतेस, थोडा अभ्यासही करत जा, असे तिला आईने बजावले. त्या कारणावरून रागाच्या भरात मुलीने अमरावतीला जाते, असे धाकट्या बहिणीला सांगून ती घराबाहेर पडली. तिच्या मोबाइलवर मेसेज केला असता, तिने फोन करून मी दुपारपर्यंत परत येते, असे सांगितले. मात्र ती परतली नाही. त्यामुळे आपल्या मुलीच्या अल्पवयाचा गैरफायदा घेऊन तिला कुणीतरी अज्ञात आरोपीने आमिष दाखवून पळवून नेले, अशी तक्रार तिच्या आईने नोंदविली. अंमलदार नंदकिशोर गवते यांनी तक्रार नोंदवून घेतली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक लक्ष्मण ढेंगळे हे करीत आहेत.