एसटीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

बडनेरा येथील जुन्या वस्तीतील सजनाजीबुवा हनुमान मंदिरापासून थोड्या अंतरावर एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिल्याने सात वर्षाच्या चिमुकल्याचा मागील चाकात येऊन जागीच मृत्यू झाला, तर आई जखमी झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला. महिला मुलाला शाळेमध्ये घेऊन जात होती.
रुद्र मंगेश धिंडाणी (७, रा. न्यू प्रभात कॉलनी, नवीवस्ती, बडनेरा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तो अमरावती ते बडनेरा मार्गावरील एका शाळेत पहिल्या वर्गामध्ये शिकत होता. नेहमीप्रमाणे त्याची आई भक्ती यांनी त्याला शाळेत सोडून देण्यासाठी दुचाकीवर बसविले.
मार्गातील सजनाजी बुवा हनुमान मंदिराजवळ अचानकपणे एमएच १४ एलएक्स ८८६३ क्रमांकाच्या एसटी बस दुचाकीला धडकली. दुचाकीवर मागे बसलेला रुद्र हा बसच्या मागील चाकाखाली आला, तर त्याची आई विरुद्ध दिशेने फेकली गेली. अपघात घडल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जबर जखमी झालेल्या रुद्रला नागरिकांनी अमरावतीला उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात त्याचा मृत्यू झाला. रुद्र याच्या पश्चात आई-वडील व बहीण आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली बस ही अकोला-चंद्रपूर फेरी करीत होती. चालक दिगंबर मंगल कनाके (४१, रा. शेखबराज, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याला बडनेरा पोलिसांनी ताब्यात घेतले.