चौकशीच्या नावावर चारचाकी चालकाकडून लुटल्या अंगठ्या
क्राईम ब्रांचचे ओळखपत्राचा बनाव, दोघांची करामत

धामणगाव रेल्वे पुलगाव-देवगाव महामार्गावर चारचाकी वाहन थांबवून व क्राईम ब्रांचचे बनावट ओळखपत्र दाखवून दोघांनी चालकाकडील ५४ हजार रुपयांचे दागिने लुटले. मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव धांदे येथे १९ एप्रिलला सकाळी सहाच्या सुमारास हा घटनाक्रम घडला. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी उशिरा रात्री तक्रार दाखल करून तपासाला प्रारंभ केला आहे.
दिलीप बापूराव देऊळकर (५८, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते शनिवारी सकाळी चारचाकी वाहनाने पुलगाव-देवगाव महामार्गाने जात होते. दुचाकीवर पाठलाग करीत आलेल्या दोघांनी चारचाकी थांबविण्याचा इशारा दिला. आम्ही क्राईम ब्रांचचे अधिकारी आहोत. तुमच्या चारचाकीमध्ये अवैध साहित्य आहे. त्यासाठी तपासणी करायची आहे, असे त्या दोघांनी ओळखपत्र दाखवीत सुनावले. देऊळकर यांनी अवैध साहित्य नसल्याचे सांगताच त्यांनी हातातील दोन अंगठ्या काढण्यास सांगितल्या. त्या त्यांनी कागदात बांधल्या आणि डिकीमध्ये ठेवण्यास सांगितले. हे दोघे यानंतर काही अंतरावर जाताच देऊळकर यांनी ती कागदाची पुरचुंडी उघडली तेव्हा त्यामधील प्रत्येकी नऊ ग्रॅमच्या दोन्ही अंगठ्या गायब होत्या. त्यांनी मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.