वडाळी येथे जलवाहिनीत बिबट; तीन तास मुक्काम
वनविभाग अन् पोलिसांचे ऑपरेशन, तार कुंपण कापून बिबट्याला वाट करून दिली

अमरावती : वडाळी भागातील नवीन एक्स्प्रेस हायवेलगतच्या गुणवंत बाबा मंदिराजवळील जलवाहिनीत चक्क बिबट्याचा मुक्काम होता. रविवारी दुपारी १२ ते ३ वाजता दरम्यान या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी ऑपरेशन राबविले. अखेर तीन-साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट रेस्क्यू झाले नि तो सुरक्षितपणे अधिवासात गेला.
एका नागरिकाने वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेल्फेअर (वॉर) सोसायटीचे सदस्य अभिजीत दाणी याला बिबट असल्याची माहिती दिली. अभिजीत आणि नीलेश कंचनपुरे यांनी घटनास्थळी धाव घेत वडाळी वन विभागाला माहिती दिली. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांसह वनपाल बाबुराव खैरकर, वनरक्षक चंद्रकांत चौले, वनरक्षक कैलास इंगळे, वनमजूर ओंकार भुरे, वाहन चालक संदीप चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर पोलिसांमार्फत गर्दी नियंत्रित करून बिबट्याला जंगलाच्या दिशेने हुसकावण्यात यशस्वी झाले. नागरिकांनी गर्दी केल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. बिबट रेस्क्यूची कार्यवाही वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाची चमू आणि वन्यजीव रेस्क्यू पथकाने संयुक्तपणे केली.
नागरिकांच्या गोंधळाने बिबट्याचे रेस्क्यू लांबले बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गोंधळ घातला. त्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. बिबट्याला जलवाहिनीतून बाहेर पडण्यासाठी वनक्षेत्रात जाण्यासाठी तार कुंपण कापून वाट करून देण्यात आली.
वडाळी येथील गुणवंत बाबा मंदिरजवळील एक्स्प्रेस हायवेखालील जलवाहिनीत बिबट शिरला होता. तब्बल तीन तासांनंतर जलवाहिनीतून बिबट बाहेर पडले. त्याला कोणत्याही इजा किंवा जखमा नव्हत्या.
वर्षा हरणे, आरएफओ, वडाळी