अंबादेवी रोडवरील ‘ते’ विनागार्ड एटीएम चोरांनी तिसऱ्यांदा फोडले !

अमरावती : राजकमल चौक ते अंबादेवी रोडवरील आयडीबीआय बँकेचे एटीएम कापून त्यातील रक्कम पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. २५ एप्रिल रोजी रात्री ती घटना घडली. २६ एप्रिल रोजी ती घटना उजेडात आल्यानंतर तेथील बॅच मॅनेजर संदीप माकोडे (४३) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी २६ एप्रिल रोजी सकाळी आरोपींविरुद्ध अज्ञात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षात ते एटीएम तिसऱ्यांदा फोडण्यात आले. मात्र, अद्यापही तेथे रात्रीचा सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला नाही. यातून बँक प्रशासन आपल्याच एटीएमच्या सुरक्षेबाबत किती सजग आहे, हे उघड झाले आहे. टांक प्लाझा या मार्केटजवळ आयडीबीआय बँक व लगतच बँकेचे एटीएम व कॅश डिपॉझिट मशीन आहे. तेथे दिवसपाळीसाठी सुभाष वाकोडे हे सुरक्षारक्षक आहेत. २६ एप्रिल रोजी सकाळी १०:१५ च्या सुमारास वाकोडे यांनी बॅच मॅनेजर संदीप माकोडे यांना फोन कॉल करून एटीएमचे फ्रंट गेट ओपन असल्याचे व मशीन काही प्रमाणात कापलेली दिसून येत असल्याची माहिती माकोडे यांना वाकोडे यांनी दिली. त्यावर संदीप माकोडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता रोख रक्कम चोरी गेली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, एटीएम मशीन हत्याराने कापून फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
१७ जानेवारी रोजी झाला होता फोडण्याचा प्रयत्न १७ जानेवारी २०२४ रोजी अंबादेवी रोडवरील आयडीबीआय बँकेचे हेच एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, वॉल्ट डोअर फोडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने आतील १६ लाख रुपये असलेला कॅश ट्रे सुरक्षित राहिला होता. विशेष म्हणजे आरोपीने ते एटीएम फोडण्यासाठी इलेक्ट्रिक कटरचा वापर केला होता. एटीएमबाहेरचे काही वायर तोडून व पुन्हा जोडून विद्युतप्रवाह मिळविला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशादेखील बदलविली होती.
२ सप्टेंबर रोजीही फोडले होते एटीएम २ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ४:३७ ते ५:३० या कालावधीत आयडीबीआय बँकेचे हेच एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. तो संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. एटीएम मशीनचे लॉक तोडण्याचा प्रयत्न त्यावेळीदेखील सीसीटीव्हीत कैद झाला होता. नेमका तसाच प्रकार २५ एप्रिल रोजी उघडकीस आला. मात्र, अद्यापही तेथे बैंक प्रशासनाने रात्रीचा सुरक्षारक्षक ठेवलेला नाही. बँक प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.