संतापजनक! शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० विद्यार्थिनींचा विनयभंग; अकोल्यात खळबळ
याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयकानं दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.

अकोला : शहरातील कौलखेड भागातील मराठी प्राथमिक शाळेतील एका कर्मचाऱ्यानं तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयकानं दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. हेमंत चांदेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचं नाव आहे.
तक्रारीनंतर आरोपीला अटक : शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या आणि शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या आरोपीनं या परिस्थितीचा गैरफायदा घेत इयत्ता चौथी व इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला. शिक्षिका प्रशिक्षण आटोपून परत आल्यानंतर काही विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार त्यांना सांगितला. यानंतर शिक्षण संस्थाचालकांनी आरोपीला ८ मार्चपासून शाळेत कर्तव्यावर न येण्याचा आदेश दिला. यानंतर या आरोपीच्याविरोधात खदान पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. प्राप्त तक्रारीवरुन खदान पोलिसांनी विविध कलमान्वये या आरोपीवर गुन्हे दाखल करून त्याला अटक केलीय.
पालकांनी व्यक्त केला संताप : दरम्यान, या घटनेमुळं शिक्षण क्षेत्र हादरलं असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. तसंच शाळेतील शिक्षिका प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या, तर त्यावेळी शाळा प्रशासनानं दुसऱ्या शिक्षिकांची त्याठिकाणी नियुक्ती का केली नाही? असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. दरम्यान, या घटनेनं काही पालक मुलांना शाळेतून काढण्याच्या मनस्थितीत असल्याचं समजतंय. मात्र, पालकांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास टाळलं आहे.