बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक, घरातून करोडो रुपयांची मालमत्ता जप्त
बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील दोन अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात ५ एप्रिलपर्यंत कोठडी आहे. दोघांच्या घरातून करोडो रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

पुणे – बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फर्निचरच्या कामाचं बिल मंजूर करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ सहाय्यकाला बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आलं होतं .या दोघांना आज न्यायालयात हजर केलं. विशेष न्यायालयानं दोघांना पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
- जयंत पर्वत चौधरी (वय ४९) आणि सुरेश विश्वनाथ बोनवळे (वय ५३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौधरी हा वरिष्ठ सहाय्यक आहे. तर बोनवळे कार्यालयीन अधीक्षक म्हणून बीजे वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहे.
पुरवठादाराकडून १ लाख ३० हजारांची मागणी-याबाबत अधिक माहिती, तक्रारदार यांचा फर्निचर पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. या तक्रारदारानं बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०२३ मध्ये २० लाख रुपये किमतीचं फर्निचर दिलं होतं. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दहा लाख रुपये किमतीच्या फर्निचर बिलाच्या मंजुरीसाठी या दोघांनी १३ टक्के दरानं तक्रारदाराकडे एक लाख ३० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार व्यावसायिकानं एक एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात याबाबत तक्रार दिली होती.
सापळा रचून दोघांना रंगेहाथ अटक- पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सूचनेनुसार ‘एसीबी’च्या पथकानं तक्रार अर्जाची पडताळणी केली. त्यामध्ये दोघा आरोपींनी १३ टक्क्याप्रमाणं एक लाख ३० रुपयांची मागणी केली. त्यापैकी तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरलं. ही रक्कम कार्यालयीन अधीक्षक बोनवळे यांनी वरिष्ठ सहाय्यक चौधरी यांच्याकडे देण्यास सांगितल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीजे वैद्यकीय महाविद्यालयात सापळा रचून दोघांना लाच घेताना ताब्यात घेतलं होतं.
करोडो रुपयांची मालमत्ता जप्त- आज सकाळी या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली असता छाप्यादरम्यान जयंत चौधरी याच्या घरून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर सुरेश बोनवळे याच्या घरून १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.