पुण्यात आंबा महोत्सव… उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमांतर्गत आयोजन!
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व पुणे जिल्हा परिषदेच्यामार्फत पुण्यातील मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केलं असून या आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

पुणे : फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्याच्या हंगामाला सुरवात झालीय. दरम्यान, पुणेकरांना कोकणातील आंबा हा बाजारातील किंमतीच्या तुलनेत स्वस्त मिळावा, या उद्देशानं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व पुणे जिल्हा परिषदेच्यामार्फत पुण्यातील मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवाचे आयोजन केलं असून या आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
प्रत्येक आंब्याला एक युनिक आयडी : पुण्यातील मार्केटयार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या या आंबा महोत्सवात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमधील उत्तम दर्जाचे आंबे असून एकूण ६० स्टॉल्स लावण्यात आलेत. उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमांतर्गत हा महोत्सव १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलाय. तसंच या आंबा महोत्सवातच पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या अस्सल गावरान वस्तूंची खरेदी आणि विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. विशेष म्हणजे, बाजारात देवगड आंब्याच्या नावाखाली जी फसवणूक होत असते, ती पाहता आंबा महोत्सवामध्ये प्रत्येक आंब्याला एक युनिक आयडी कोड लावलाय. ज्यामध्ये ग्राहकाला हा आंबा कोणत्या आणि कुठला आहे? याबाबतची माहिती मिळणार आहे.
काय म्हणाले पणन मंडळाचे अधिकारी? : याबाबत पणन मंडळाचे अधिकारी सुहास काळे म्हणाले की, “यंदाच्या वर्षी ग्राहकांसाठी शेतकरी ते थेट ग्राहक अस आंबा महोत्सवाचं आयोजन केलं असून या महोत्सवातील विशेष बाब म्हणजे देवगड आंब्याच्या नावाखाली जी फसवणूक होत असते, ती पाहता प्रत्येक आंब्याला एक युनिक आयडी कोड लावला आहे. ज्यात ग्राहकाला हा आंबा कोणत्या शेतकऱ्याकडील आहे आणि कुठला आहे, याची माहिती मिळणार आहे. तसंच चालू वर्षातील हंगामामध्ये आंब्याचं उत्पादन कमी प्रमाणात झालं असल्यानं सध्या तरी आंब्याच्या भावात चढ पाहायला मिळणार आहे. पण काही दिवसांनी हे दर देखील कमी होणार आहे. आंबा महोत्सवात ८०० रूपयांपासून ते १५०० रूपयांपर्यंत एक डझन आंबे मिळतील”, असं यांनी सांगितलं.