दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळं भाजपा आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू, उपचारासाठी मागितले 10 लाख…
पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळं एका गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळं भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढ्या उन्मत्तपणा येणं अशक्य आहे. असं म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केलीय.
प्रशासनाच्या मुजोरपणामुळं झाला मृत्यू : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी अडीच लाख भरल्यानंतरही पूर्ण 10 लाख रुपये देत नाही तोपर्यंत उपचार करणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळं महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर महिलेनं दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. परंतु तिचा आता मृत्यू झाला असून हा मृत्यू दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळं झाला असल्याचं सांगितलं जातय.
भाजपा आमदाराच्या पीएच्या पत्नीचा मृत्यू : याबाबत आमदार अमित गोरखे म्हणाले की, बुधवारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मोनाली सुशांत भिसे यांचे पती सुशांत भिसे माझ्याकडं स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांची पत्नी ही गरोदर असल्यानं त्यांनी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात प्रसूतीसाठी गेली असताना, दहा लाख भरा नाहीतर आम्ही ऍडमिट करून घेणार नाही असं सांगितलं गेलं. त्यांच्या नातेवाईकांनी 3 लाख रुपये भरण्याची तयारी केली होती. तर क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे म्हणून त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही. मंत्रालयातून कॉल गेले असताना देखील त्या भगिनीला ऍडमिट करून घेतलं नाही. त्यामुळं त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि तिथं ट्रीटमेंट मिळाल्यानंतर त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, दुर्दैवाने मोनाली भिसे यांचा मृत्यू झाला. दीनानाथ रुग्णालय हे गरिबांसाठी तसंच एक ट्रस्ट म्हणून चालवलं जातं. मात्र, त्यांनी अशा प्रकारचा गंभीर गुन्हा केला आहे. त्यामुळं रुग्णालयावर गंभीर पावले उचलावी अशी मागणी गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.
… तरी देखील रुग्णालय दिमाखात उभ (सुषमा अंधारे) : याबाबत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळं आणि अत्यंत संवेदनशीलपणामुळं तिला आपलं जीव गमवावा लागलं. विशेष बाब म्हणजे भिसे ही भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी आहे. त्यांना ऍडमिट करण्यासाठी मंत्रालयातून फोन आलेला असताना देखील त्यांना ऍडमिट करण्यात आलं नाही. दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात असंख्य तक्रारी असताना देखील रुग्णालय दिमाखात उभ असून सत्ताधाऱ्यांच्या राजाश्रयाशिवाय रुग्णालय प्रशासनामध्ये एवढ्या उन्मत्तपणा येणं अशक्य आहे”.
रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार : या घटनेसंदर्भात दीनानाथ रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भातला अहवाल आम्ही राज्य सरकारला सादर करणार आहे. मीडियात सध्या बातम्या येत आहेत त्या अर्धवट आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे. सध्या मला यावर जास्त बोलता येणार नाही असं यावेळी दीनानाथ रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले.