“उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची दिली होती ऑफर, पण…”, दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट!
जेव्हा शिवसेना पक्षात मतभेद झाले होते, तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केलाय.

मुंबई : वक्फ बोर्ड सुधारित विधेयक हे मुस्लीम बांधवांच्या हिताचं आहे. तीन तलाकमध्ये सुधारणा करुन मुस्लीम महिलांना केंद्र सरकारनं न्याय दिला. तसंच वक्फ बोर्ड सुधारित विधेयक हे मुस्लीम समाजाच्या हिताचेच आहे. पण याचा विरोधक चुकीचा प्रचार करतायेत, असं माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. तसंच, जेव्हा शिवसेना पक्षात मतभेद झाले होते, तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट देखिल दीपक केसरकरांनी केलाय. मुंबईत आज पत्रकार परिषदेत ते बोलते होते.
… तेव्हा एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात पाणी आलं : दीपक केसरकर म्हणाले की, “जेव्हा शिवसेना पक्षात मतभेद झाले होते, तेव्हा पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. मात्र शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा युतीची स्थापना करण्यात यावी, अशी एकनाथ शिंदे यांनी मागणी केली होती. पण उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मागणी मान्य केली नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचे पाऊल उचलले”, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला. तसंच, “जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्यापुढे ठेवण्यात आला. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले. ते खूप भावनाप्रधान झाले. तेव्हा शिंदे म्हणाले की, तुम्हीच मुख्यमंत्री राहा… पण ज्या जनतेनं एका विचारधारेसाठी आपल्याला निवडून दिलं आहे. त्या जनतेच्या मताचा आदर करुया आणि पुन्हा एकदा युतीची स्थापना करूया, असं शिंदेंनी ठाकरेंना सांगितलं. पण ठाकरेंनी यास नकार दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी टोकाचे पाऊल उचलले”, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
‘एक राज्य, एक गणवेश’ आणण्यामागं एक तत्व होतं : दरम्यान, दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना सुरू केलेली ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना सरकारनं रद्द केलीय. याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, “मी याबाबत विद्यमान शिक्षणमंत्र्यांना निरोप दिलेला होता की मुलांचे गणवेश चांगले आहेत. कृपया बदलू नका. तसंच मुलांचे पाठीवरचे ओझं हेही कमी झालं होतं. हा निर्णय बदलण्यात आलाय. ‘एक राज्य, एक गणवेश’ आणण्यामागं एक तत्व होते की, डिग्निटी ऑफ लेबर. स्कॉट अॅन्ड गाईड हाच महाराष्ट्राचा मुलांचा ड्रेस करण्यात आला होता”, असं दीपक केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.