फळपिकांनी शेतकरी मालामाल; संत्रा, केळी, डाळिंबातून पैसा
फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; 'मग्रारोहयो'तून आर्थिक बळ

अमरावती : आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकरी आता प्रगत शेती करू लागला आहे. यामध्ये फळपीक लागवडीकडे सर्वाधिक कल आहे. फळपीक लागवडीसाठी असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांसोबत शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचेही आर्थिक सहकार्य होते. शेतकऱ्यांना कमी श्रम व कमी दामात अधिक फायदा होत आहे.
हवामानातील बदल, बाजारभावातील अनिश्चितता यासोबतच पारंपरिक शेतीत नेहमीच होणारे आर्थिक नुकसान यामुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल बागायती शेतीसोबतच आता फळपीक शेतीकडेही वळला आहे. यामध्ये मनरेगातंर्गत १४४१ हेक्टरमध्ये विविध १४ प्रकारची फळबाग लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. याशिवाय ७४७हेक्टरमध्ये शेतीच्या बांधावरदेखील फळबाग लागवड केली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत १६२९ शेतकऱ्यांनी १४४१ हेक्टरवर फळबाग लागवड केली. यामध्ये १३.२१ लाखांचा निधी त्यांना प्राप्त झालेला आहे. फळबाग लागवडीमध्ये संत्रा, मोसंबी, केळी व आंबा लागवडीचे क्षेत्र इतर फळपिकांच्या तुलनेत जास्त आहे. या योजनेंतर्गत लागवड झालेल्या क्षेत्रात बोर व चिंचेचे क्षेत्र मात्र निरंक आहे.
फळपिकांच्या क्षेत्रात वाढ? जिल्ह्यात पूर्वीपासून संत्र्याचे क्षेत्र विदर्भात सर्वाधिक आहे. फळबागेत शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे अधिक आहे.
सिंचन सुविधेसाठी अनुदान शेतकऱ्यांना शेतात विहीर, मोटरपंप, पाइपलाइन, सूक्ष्म व तुषार सिंचनासाठी विविध योजनेतून शासनाचे अनुदान मिळते. याचा फायदा होत असल्याने या क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
फळांसोबत आता फुलशेतीही काही शेतकरी फळांसोबत भाजीपाला व फुलशेतीही करीत आहेत. गुलाब, निशिगंध यासह अन्य फुलझाडे लावत आहेत. यामधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
चार वर्षांपूर्वी एकरभरात मोसंबी व अर्ध्या एकरात डाळिंबाची लागवड केली. याच वर्षीपासून उत्पन्न येण्यास सुरुवात झालेली आहे.
रवींद्र ठाकरे, फळउत्पादक
पावसाच्या लहरीपणामुळे जिरायती शेतीमध्ये पिकांचे मोठे नुकसान होते. यामुळे अनेकवेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यायमुळे योजनेतून विहीर घेऊन संत्र्याची लागवड केली आहे.
अशोक वानखडे, फळ उत्पादक
पारंपरिक पीकपद्धती खर्चीक खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यात पारंपरिक शेतीपिकांचे उत्पादन घेतले जाते. जिरायती शेती पावसावर अवलंबून आहे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळते.