कर्जमाफीसाठी उद्धवसेनेचा रास्तारोको
पंचवटी चौकात आंदोलन महायुती सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी

अमरावती : राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकार सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी तातडीने द्यावी या मागणीसाठी सोमवारी येथील पंचवटी चौकात उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितले; परंतु निवडणूक होताच सत्तेत आल्यानंतर सरकारने कर्जमाफीचा शब्द फिरविला व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी कर्ज भरावे, असा सल्ला देऊन शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. महायुती सरकारने निवडणुकीच्या विधानसभा जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी मागणी यावेळी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी आंदोलनात मनोज कडू, नरेंद्र पडोळे, प्रदीप बाजड, उपजिल्हाप्रमुख राजेश बंड,प्रफुल भोजने, याह्या खान पठाण, डॉ. नरेंद्र निर्मळ, विलास माहुरे, तालुकाप्रमुख नितीन हटवार, कपिल देशमुख, रामदास बैलमारे, प्रमोद कोहळे, दिलीप केणे, कुमार आंडे, नरेंद्र देऊळकर, गजानन यादव, संजय चौधरी, सुरेश जुनघरे, नीलेश मुंदाने, शंकर वाटाणे, उपतालुका प्रमुख आश्विन नागे, शैलेश पांडे, समाधान गाडगेसह शेकडोंचा सहभाग होता. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.