शेती वाढविण्यासाठी शहानूरचा कालवा भुईसपाट
मलकापूर बु. येथील शेतकऱ्याची कालवा, वन विभागाकडे तक्रार

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मलकापूर बु, येथील काही शेतकऱ्यांनी थोडक्या जमिनीच्या तुकड्याच्या हव्यासापाई शहानूर कालव्याची नासधूस करून त्यावर नैसर्गिकरीत्या लागलेली वृक्ष संपदा नष्ट करून तिची विल्हेवाट लावली. त्याबाबत परिसरातील एका शेतकऱ्याने कालवा विभाग व वनविभागाकडे तक्रारी केल्या. तथापि, अद्याप त्याची दखल घेण्यात आली नसल्याची स्थिती आहे.
मलकापूर बु येथून विहिगाव सातेगाव हा शहानूर प्रकल्पाचा मुख्य कालवा २५ ते ३० वर्षापासून अस्तित्वात आहे. कालव्याची जमीन आता शासनाच्या मालकीची झाली आहे. परंतु, मलकापूर शिवारात सर्व्हे नं ९२ चे बांधासमोरील शेतकऱ्यांनी हा मुख्य कालवा जेसीबीने सपाट केला आणि त्यावर नैसर्गिकरीत्या बहरलेली वृक्ष संपदा नष्ट केली. बाभूळ, कडूनिंब, पळस, गोंदण आदी लहान-मोठ्या झाडांची विल्हेवाट लावण्यात आल्याची तक्रार मलकापूर बु. येथील तक्रारकर्ते रमेश खारोळे यांनी केली. कालव्याचे तोंड बंद झाल्याने पावसाळ्यात कोसळणारे अतिरिक्त पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरून नुकसान करणार आहे. कालवा पूर्ववत करून शासकीय जमिनीचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपअभियंता, शहानूर कालवा निरीक्षक अंजनगाव सुर्जी व वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा यांच्याकडे करण्यात आली. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.