जंगलालगत शेतीसाठी कुंपणाचा पथदर्शी प्रकल्प
वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा; ७५ एकरांकरिता ९१ लाख मंजूर

वरूड : वनालगतच्या शेतजमिनीकरिता कुंपणाचा राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प वरूड तालुक्यात राबविण्यात येणार आहे. ७५ एकर शेतजमिनीकरिता सामूहिक कुंपणाचा ९१ लाख ६ हजार रुपये खर्च शासनाने मंजूर केल्याची माहिती आ. उमेश यावलकर यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सातपुडा पर्वताची किनार लाभलेल्या वरूड तालुक्यातील महेंद्री, पंढरी राखीव वनपरिक्षेत्रालगत असलेल्या शेतीला वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. तक्रारी-निवेदने करूनही दखल घेतली गेली नाही. अखेर आ. यावलकर यांनी विधानसभेत हा प्रश्न लावून धरला. आता पथदर्शी प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यामध्ये शासनाचा ९० टक्के निधी, तर शेतकऱ्यांना १० टक्के स्वनिधी द्यावा लागेल.
वैनगंगा व नळगंगा नदीजोड प्रकल्पाकरिता वरूड, मोर्शी तालुक्यामध्ये सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी शासनाकडून निविदासुद्धा काढण्यात आल्या. हा प्रकल्प तीन ते चार वर्षांत पूर्ण होईल. पंढरी प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्णत्वास नेण्याकरिता शासनाकडे मागणी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर २५ हजार एकरांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शासनाने याकरिता २० करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्र शासनाकडे कर्जमाफीकरिता निधी उपलब्ध नसला तरी भविष्यात ती नक्की होईल. कुठल्याही शेतकऱ्याकडून सक्तीची कर्जवसुली करू नये. दोन्ही तालुक्यात आरोग्य सेवेसाठी भासत असणारी कमतरता लक्षात घेता, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून समस्या मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आ. यावलकर म्हणाले.