अमरावती उपविभागीय कार्यालयात ‘ई-जनसंवाद’
एसडीओ अनिल भटकर यांचा थेट संवाद, नावीन्यपूर्ण उपक्रम

अमरावती : मुख्यमंत्री यांच्या १०० दिवस कृती आराखड्याचा भाग म्हणून अमरावती उप विभागीय कार्यालयाने ‘ई-जनसंवाद’ हा नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या आता घरबसल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.
उपविभागीय अधिकारी, अमरावती यांच्यासोबत थेट संवाद साधण्यासाठी, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी १० ते ११ या वेळेत ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधता येईल. यासाठी नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात ८ एप्रिलपासून करण्यात आली आहे. नागरिकांनी यात सहभाग नोंदवून समस्या आणि सूचना मांडल्या. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.
उपक्रमात नवीन अग्रवाल, दिलीप दलाल, नितीन हटवार, अरुण राऊत, संजय मोहोड, डॉ. जामठे, नरेंद्र भगत यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांना पत्र पाठवण्यात आले आहे.