भीम गीतांवर तरुणाईने धरला ठेका..
अंजनगाव सुर्जी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

प्रतिनिधी श्रीकांत नाथे : अंजनगाव सुर्जी -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त अंजनगाव सुर्जी शहरात विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. दि.१४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी निघालेल्या भव्य मिरवणुकीमध्ये डीजेच्या दणदणाटात व लेझर शोच्या प्रकाशात तरुणांनी आंबेडकरी गीतांवर ठेका धरला.
यावेळी अंजनगाव सुर्जी शहरात ठिक-ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भीम नगर,वानखडे पेठ,वाघपुरा येथील तीन मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन मोठ्या जल्लोषात जयंती उत्सव साजरा केला. तसेच यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित गाणी व जीवन गाथेवर चित्रपटातील गाण्यांवर तरुण-तरुणी, महिला-पुरुषांनी यावेळी ठेका धरत जल्लोष केला.
तसेच अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन कार्यालय व मिरवणुकी दरम्यान परि.सहायक अधीक्षक प्रशांत डगळे यांनी स्वतः हजर राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.