ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

बासलेगाव तुळजाभवानी मातेचे जागृत ठिकाण

अक्कलकोट प्रतिनीधी : अक्कलकोट आई तुळजाभवानीची विविध रूपं महाराष्ट्रामध्ये आहेत. मात्र खंडित स्वरूपामध्ये असणारी देवी ही अक्कलकोट तालुक्यातील बासलेगावी आहे. बासलेगांव अक्कलकोट शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे तुळजाभवानी मातेचे जागृत ठिकाण असून याची कहाणीही मोठी विलक्षण आणि रोमांचकारी आहे. खंडित स्वरूपात भवानी मातेची दोन मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळ आहे.

पाच शतकापूर्वी बासलेगाव या डोंगराने वेढलेल्या आणि वनराईने नटलेल्या छोट्याशा गावात बासलिंग नावाचा तुळजाभवानीचा भक्त होऊन गेला. त्याची तुळजाभवानीवर अनन्य श्रद्धा होती. तो दररोज पहाटे स्नान उरकून दर्शनासाठी तुळजापूरला जात असे आणि दर्शनानंतर परत बासलेगावी येई. मगच अन्नग्रहण करीत. हे देवी दर्शनाचे व्रत वर्षानुवर्षे चालू होते. कोणताही ऋतू असो त्याचे तुळजापूरला जाणे हे अखंड चालू होते. बासलिंगाच्या या कठोर व्रताच्या कसोटीच्या क्षणाला आता तो वार्धक्याकडे झुकल्याने बासलिंगाला तुळजापूरला जाणे अशक्यप्राय होत होते. पण श्रद्धा मात्र अतुट होती. पौर्णिमेला तर दर्शन व्हायलाच हवे, पण शरीर साथ देत नव्हते. अशाही अवस्थेमध्ये तो तुळजापूरला निघाला. एक एक पाऊल टाकणे कष्टप्रद होते. दिवस कलला. मात्र रस्ता सरत नव्हता. आता समोर आली ती बोरी नदी दुथडी भरून वाहणारी. जायचे कसे असा प्रश्न पडला. पण त्याने क्षणाचाही विचार न करता त्या वाहत्या पाण्यामध्ये उडी मारली आणि देवीचे नामस्मरण करू लागला. पण पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे त्याचे काही चालेना. झाले तो गटांगळ्या खाऊ लागला. इतक्यात चमत्कार घडला. नदीचे पाणी दोन्ही बाजूला सरले आणि वाट मिळाली. आईच्या कृपेची प्रचिती आली. तो तुळजापूरला गेला.

भवानीमातेचे दर्शन घेतले आणि म्हणाला, आई जगदंबे कदाचित आता हे शेवटचे दर्शन, कारण माझे वय झाले आहे. आता चालणे मुश्कील होत चालले आहे. देवी प्रसन्न झाली. तेव्हा बासलिंग म्हणाला, यापुढे मला तुळजापुरी येणे होईल की नाही हे माहीत नाही. पण माझी इच्छा आहे तू माझ्या गावी यावीस. बासलिंगाची दृढ श्रद्धा पाहून देवीने येण्याचे मान्य केले. पण अट घातली. मी तुझ्या गावी येते पण तू पुढे चालत राहा. मागे वळून पाहू नकोस.

बासलिंगला आनंद झाला. आई राजा उदो उदो…च्या गर्जना करीत तो अक्कलकोटकडे आणि बासलेगावच्या सीमेवर निघाला पोहोचला. आता डोंगरावरून त्याला खाली गाव दिसत होते. तो गावाच्या उतरणीला लागला. पण त्याचे मन मात्र त्याच्या ताब्यात राहिले नाही. त्याने मागे वळून पाहिले आणि देवी तिथेच थांबली. आपल्या हातून मोठी चूक झाली याची त्याला जाणीव होताच बासलिंगाला अतिशय वाईट वाटले. त्याने देवीची मनधरणी केली. प्रार्थना केली. पण उपयोग होत नव्हता. मध्यरात्र होत आली. शेवटी अतिव दुःखाने बासलिंगाने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आणि डोंगर माथ्यावरून उडी मारून काट्याकुट्यातून दगडा धोंड्यातून ठेचकाळत रक्तबंबाळ होऊन तो डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीत पडला.

भवानी मातेला त्याची दया आली. तिने बासलिंगाला विहिरीतून बाहेर काढले. बासलिंग शुद्धीवर आला. तुळजाभवानी म्हणाली, मी तुझ्या इच्छेप्रमाणे येथे आले. तुझी भक्ती पाहून मी गावात देखील येईन आणि डोंगर माथ्यावरही. त्यामुळे डोंगर माथ्यावर देवीची फक्त पाऊले आहेत. तर मूर्ती ही गावातील मंदिरात आहे. बासलिंगाने देवीची पूजाअर्चा केली आणि दुसऱ्या क्षणी जीवनाचे सार्थक झाले म्हणून मंदिरासमोरील विहिरीमध्ये जलसमाधी घेतली. बासलिंगाची समाधी ही गावातील मंदिर आणि डोंगरावरील मंदिर याच्या मध्ये आहे. नवरात्रीला, नवरात्र पौर्णिमेला आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठ्या प्रमाण प्रमाणात पूजाअर्चा, उत्सव साजरा केला जातो. अशाप्रकारे खंडित स्वरूपात देवीची दोन मंदिरे असणारे बासलेगाव हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.