गुन्हेगारांची १०० दिवसांची ‘कृती’; गुन्ह्यात २७३ ने वाढ!
खून, बलात्कार, दुखापतीच्या गुन्ह्यात वाढ : वाहनचोरी, दरोड्यात घट

अमरावती : शासनव्यवस्थेत १०० दिवसांच्या कृती आराखड्यावर भक्कमपणे काम होत असताना दुसरीकडे गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे यंदाच्या पहिल्या १०० दिवसांत दिसून आले आहे. १ जानेवारी ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत ग्रामीण भागातील ३१ पोलिस ठाण्यात तब्बल १,२३१ गुन्हे नोंदविले गेले. गतवर्षीच्या तुलनेत दाखल गुन्ह्यात २७३ ने वाढ नोंदविली गेली आहे. याच कालावधीत गतवर्षी तो आकडा ९५८ असा होता.
यंदा पहिल्या १०० दिवसांत अर्थात १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, बलात्कार, फसवणूक, सरकारी कर्मचारी हल्ला, दुखापतीसह अपहरणाच्या गुन्ह्यात वाढ नोंदविली गेली. तर, दरोडा, विनयभंग, वाहनचोरी, गैरकायद्याची मंडळी, सदोष मनुष्यवध आदी गुन्ह्यात घट नोंदविली गेली. विशेष म्हणजे अपघातात १२ ने घट झाली आहे.
३२ खून गतवर्षी झालेत. तर खुनाचा प्रयत्न : ५९, चोरी : ८७३, वाहनचोरी : २२८, बलात्कार : १३२, विनयभंग : २९०, दुखापतीचे १३८७ गुन्हे घडले होते.
अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढतीच जिल्ह्यात ३१ पोलिस ठाणी आहेत. त्यात १ जानेवारी ते १० एप्रिल या कालावधीत भाग १ ते ५ (गंभीर गुन्हे) चे १२३१ गुन्हे नोंदविण्यात आले. तर त्या तुलनेत अदखलपात्र गुन्ह्यांची (एनसी) संख्यादेखील दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दररोज सरासरी ३० ते ४० अदखलपात्र गुन्हे दाखल होतात. त्या सरासरीने पहिल्या १०० दिवसांत ३ ते ४ हजार एनसी दाखल झाल्या आहेत..