जॉबच्या नावावर फसवणूक

अमरावतीः नोकरीच्या नावावर एका महिलेची अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत १० एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश पाटील, रविकांत माहूलकर व दोन महिला अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी संगनमत करून तक्रारदार महिलेला त्यांच्या बहिणीच्या मुलाला आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावून देण्याची बतावणी केली. त्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून २ लाख ५०हजार रुपये उकळले; परंतु रक्कम दिल्यावर महिलेच्या बहिणीच्या मुलाला नोकरी लावून दिली नाही. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपींनी त्यासाठी आपली संबंधित विभागात दुरपर्यंत ओळख असल्याची बतावणी केली. काहींसोबत बोलणेदेखील करवून दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. महिलेने रक्कम दिल्यानंतर विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पुढे फोन कॉललाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महिलेने राजापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.