चोरी, घरफोडी करणारे निघाले बालक!
चौघे ताब्यात : २४ तासांच्या आत उलगडा, मुद्देमालही जप्त

अमरावती दीपनगर नंबर २ येथील अनिरुद्ध पांडे यांच्या काकाच्या घरातील सोलर प्लेट चोरीप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांनी त्या गुन्ह्यासह फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नोंद चोरीच्या अन्य एका गुन्ह्याचीदेखील कबुली दिली. त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी व घरफोडीचा प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आणून ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दीपनगर क्रमांक २ येथील रहिवासी अनिरुद्ध अरुण पांडे (४९) हे सोलर प्लेटचा व्यवसाय करतात. त्यांनी त्यांना मिळालेल्या ऑर्डरच्या सोलर प्लेट व इतर साहित्य हे त्यांच्या काकाच्या घरी अंगणात ठेवले होते. हे २० हजार रुपयांचे साहित्य लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी अनिरुद्ध पांडे यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. तपासात या गुन्ह्यात चार विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच रामनगर येथे घरफोडी केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यांतील ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात फ्रेजरपुराचे ठाणेदार नीलेश करे, पोलिस निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलिस उपनिरीक्षक राहुल महाजन, योगेश श्रीवास, शशिकांत गवई, हरीश चौधरी, रोशन वन्हाडे, जयेश परिवाले, दिनेश नेमाडे यांनी केली.