जनरेटरसाठी कागदावरच लाखोंची डिझेल खरेदी
मेळघाटचे आरोग्य केंद्रातील प्रकार, लाखोंचा घोटाळा उघडकीस

परतवाडा : मेळघाटात विद्युत पुरवठा खंडित होतो. त्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गतवर्षी लाखो रुपये किमतीचे जनरेटर पाठविण्यात आले; परंतु ते जनरेटर कागदोपत्री वापरून त्यावर लाखो रुपयांचा डिझेल घोटाळा केला गेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या हाती आला आहे, गोपनीय तक्रारही आरोग्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. चिखलदरा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार झाल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दीड वर्षापूर्वी सीएसआर फंडातून प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये किमतीचे ११ जनरेटर पुरवण्यात आले. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही खरेदी करण्यात आली. जनरेटरला मोठ्या प्रमाणात डिझेल लागल्याचे कागदपत्रे दाखविले गेले. त्यानुसार प्रत्येकी दोन महिन्यांत दीड ते दोन लक्ष रुपये खर्च केले गेले. या सर्व प्रकरणाची तपासणी होणे गरजेचे ठरले आहे. यात अनेकांचे हात ओले झाल्याची चर्चा बरीच बोलकी आहे. यावर वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
चार आरोग्य केंद्रांमध्ये झाली खरेदी चिखलदरा तालुक्यातील सलोना, सेमाडोह, काटकुंभ व हतरू या चार प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात जनरेटरसाठी लाखो रुपयांची डिझेल खरेदी केले गेल्याचे दाखविण्यात आले.
कितीदा खंडित झाला पुरवठा !
जनरेटरसाठी लाखो रुपयाचे डिझेल वापरले. त्या दोन महिन्यात अनेकदा विद्युत पुरवठा खंडित झाला. दररोज किती युनिट वीज लागते, जनरेटर प्रत्येक तासाला वीज निर्माण करण्यासाठी किती डिझेल घेते, याची चौकशी व्हावी.
असे झाले बिल पास डिझेल खरेदी करताना बहुधा नगदी स्वरूपात खरेदी केले जाते. ती बिले प्राथमिक आरोग्य केंद्रातून तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात सादर करण्यात येतात. पुढे ही पंचायत समिती कार्यालयात पाठवून त्यावरील रक्कम विशिष्ट शीर्षाखाली संबंधित अधिकाऱ्याच्या खात्यात जमा होते. एवढी तपासणी होत असतानाही त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डिझेलसंदर्भात प्रकरणाची चौकशी करू. तसे झाले असेल, तर संबंधितांकडून वसुली करण्यात येईल. योग्य ती कारवाई केली जाईल.
सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती