पाच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा, ४२३ महाविद्यालये अन् केवळ २४८ कर्मचारी
१९९२ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला ब्रेक, राज्य शासन केव्हा लक्ष देणार?

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रिक्त पदांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यंदा तब्बल ७५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होणार असल्याने पाच लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा, ४२३ महाविद्यालयांचा कारभार कसा हाताळावा, हा प्रश्न कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह कुलसचिवांसमोर निर्माण झाला आहे. आजमितीला केवळ २४८ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर डोलारा सांभाळला जात आहे.
विद्यापीठात १९९२ पासून शिक्षकेतर कर्मचारी भरती राबविली गेली नाही. दरमहा चार ते पाच कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, २०२५-२६ या वर्षात ७५ कर्मचारी निवृत्त होतील, तर वर्षअखेर ३० टक्के कर्मचारी शिल्लक असतील, अशी विदारक स्थिती विद्यापीठात निर्माण होणार आहे. कर्मचारी भरतीसंदर्भात सुधारित आराखडा तयार करून तो राज्य शासनाकडे पाच ते सहा वेळा पाठविल्याची माहिती आहे. मात्र रिक्त पदांबाबतचा प्रस्ताव राज्यपाल, राज्य शासनाकडे पडून आहे. किमान महायुती सरकारच्या काळात तरी अमरावती विद्यापीठात रिक्त पदांची समस्या सुटून नवीन पदभरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी अपेक्षा बेरोजगार तरुणाईची आहे.
अनेक योजना, विविध उपक्रमांचा भडीमार राज्य सरकारकडून दरदिवसाला कोणत्यातरी योजना, उपक्रमांचे लाँचिंग केले जात आहे. मात्र, या योजना, उपक्रम राबविण्यासाठी मनुष्यबळ याचा कोणीही विचार करीत नाही. त्यामुळे योजना, उपक्रम सुरू होते, पण तेही कागदावर राहत असून पुढे त्या आपसुकच बंद पडतात. याला उच्च शिक्षण विभागही अपवाद नाही.
राज्य शासनाकडे चार ते पाच वेळा रिक्त पदांसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला. १९९२ पासून रिक्त पदांचा लेखाजोखा सादर केला आहे. यंदा तर ७५ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने विद्यापीठापुढे मोठी समस्या निर्माण होणार आहे.
डॉ. अविनाश असनारे, कुलसचिव
राज्यपाल कार्यालयातून ३५ विषयांचे पत्र नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि त्याच्या सूक्ष्म अंमलबजावणीसाठी विद्यापीठे, उच्च शिक्षण विभागाकडे राज्यपाल कार्यालयातून ३५ विषयांचे पत्र राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारवरे यांनी पाठविले आहे. या विषयांच्या अंमलबजावणीसाठी डेडलाईन आहे.
प्राध्यापकांची ५५ पदे रिक्ते विद्यापीठाला वर्षभरात उन्हाळी व हिवाळी मिळून एकूण ७५०० परीक्षांचे नियोजन करावे लागते. ३० ते ४५ दिवसांत या परीक्षा घेऊन ४५ दिवसात निकाल जाहीर करणे अनिवार्य आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापक नाहीत. अमरावती विद्यापीठाच्या शिक्षण विभागात ५५ पदे प्राध्यापकांची रिक्ते आहेत.